बेळगावात “आगमन सोहळ्या”ची नवी परंपरा रुजवणारे भांदुर गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

बेळगावात “आगमन सोहळ्या”ची नवी परंपरा रुजवणारे भांदुर गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मुंबईतील संकल्पना बेळगावच्या संस्कृतीत रुजवून निर्माण केली वेगळी ओळख

बेळगाव : गणेशोत्सव म्हटले की भक्ती, उत्साह, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव. मात्र या उत्सवात “गणेश आगमन सोहळा” ही स्वतंत्र आणि आकर्षक संकल्पना बेळगावात सर्वप्रथम प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय भांदुर गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला जाते. यंदा मंडळ आपल्या स्थापनेचे ८५ वे वर्ष साजरे करत असून, आगमन सोहळ्याच्या परंपरेलाही १० वर्षे पूर्ण होत आहेत.

मुंबईसारख्या महानगरांमध्ये गणेश आगमन मिरवणुकींची परंपरा पूर्वीपासून प्रचलित होती. तेथील भव्य स्वागत सोहळे, विविध देखावे आणि संकल्पनांवर आधारित मिरवणुका पाहून प्रेरित झालेल्या भांदुर गल्लीतील युवकांनी ही संकल्पना बेळगावात रुजवण्याचा निर्धार केला. २०१६ साली प्रथमच मंडळाने स्वतंत्र “आगमन सोहळा” आयोजित केला आणि शहरात एका नव्या सांस्कृतिक पर्वाची सुरुवात झाली.

त्या काळात गणेश चतुर्थीच्या दिवशीच मूर्ती कार्यशाळेतून मंडपात आणावी लागत असल्याने वेळेची मोठी अडचण निर्माण होत होती. गर्दी, विलंब आणि व्यवस्थापनातील अडथळे यामुळे युवकांनी वेगळा विचार मांडला. गणरायाचे आगमन हेही एक स्वतंत्र उत्सव म्हणून साजरे व्हावे, भक्तांना त्याचा आनंद घेता यावा आणि गणेशोत्सवाची सुरुवात अधिक भव्य व्हावी या उद्देशातून “आगमन सोहळा” ही संकल्पना आकाराला आली.

आज हीच संकल्पना बेळगावातील अनेक मंडळांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. भांदुर गल्ली मंडळाने सुरू केलेली परंपरा आता शहरभर लोकप्रिय झाली असली तरी तिची पहिली ठिणगी याच मंडळाने पेटवली, हे विशेष महत्त्वाचे मानले जाते.

मंडळाच्या आगमन सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सादर होणारे आकर्षक देखावे आणि कल्पक संकल्पना. शंकर-पार्वती विवाह सोहळा, गंगा आरती, अघोरी साधूंचे देखावे, धार्मिक आणि पौराणिक संकल्पनांवर आधारित सादरीकरणे यामुळे हा सोहळा केवळ मिरवणूक न राहता एक सांस्कृतिक अनुभव बनला आहे. “पहिली बॅलन्स मूर्ती” ही अभिनव संकल्पनाही मंडळानेच साकारत वेगळी ओळख निर्माण केली.

विशेष म्हणजे, आधुनिक डीजे संस्कृतीच्या वाढत्या प्रभावातही मंडळाने पारंपरिक मिरवणुकीची ओळख जपली आहे. ढोल-ताशे, लेझीम, धार्मिक घोषणांनी भरलेले वातावरण आणि शिस्तबद्ध मिरवणूक यामुळे आगमन सोहळ्याला भक्तीचा आणि संस्कृतीचा स्पर्श मिळतो.

या संपूर्ण उपक्रमामागे परिसरातील सुमारे १५० हून अधिक युवकांची मेहनत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व समाजघटकांचाही मोठा सहभाग असतो. युवकांच्या कल्पकतेला नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने भांदुर गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज बेळगावच्या गणेशोत्सव संस्कृतीतील एक प्रेरणादायी नाव बनले आहे.

गणरायाच्या आगमनाला उत्सवाचे स्वरूप देत, मुंबईतील परंपरेला बेळगावच्या मातीत रुजवून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम भांदुर गल्ली मंडळाने केले आहे. त्यामुळेच आज “आगमन सोहळा” म्हटले की बेळगावकरांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम भांदुर गल्ली मंडळाचे नाव अभिमानाने उभे राहते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − 4 =

error: Content is protected !!