आर.पी.डी. पदवी पूर्व महाविद्यालयात काव्य लेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न

आर.पी.डी. पदवी पूर्व महाविद्यालयात काव्य लेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न

बेळगाव: आर.पी.डी. पदवी पूर्व महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये काव्यलेखनाची आवड निर्माण व्हावी, सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि कवितेच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा या उद्देशाने शनिवारी (२५ जुलै) काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथील मराठी विभागप्रमुख प्रा. अशोक अलगोंडी उपस्थित होते. त्यांनी “कविता कशी सुचते, कवितेचा जन्म कसा होतो, अनुभव, निरीक्षण, संवेदनशीलता आणि कल्पनाशक्ती यांचा कवितेशी असलेला संबंध तसेच कविता प्रभावीपणे कशी सादर करावी” याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक प्रा. महादेव खोत यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी आणि नवोदित कवींना योग्य दिशा देण्यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एस. सिमनगौडर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. शार्मीन फर्नांडिस उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रतीक्षा गावडे हिने केले. सलोनी नाईक हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर नकुल गावडे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. साहित्यप्रेम आणि सर्जनशीलतेचा उत्सव ठरलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × three =

error: Content is protected !!