बेळगावच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठत निवडणूक आयोगाला दिले निवेदन; मराठीत SIR फॉर्म उपलब्ध करण्याच्या मागणीला यश

बेळगावच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठत निवडणूक आयोगाला दिले निवेदन; मराठीत SIR फॉर्म उपलब्ध करण्याच्या मागणीला यश

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील फॉर्म मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजीराव पाटील आणि मोतेश बारदेशकर यांनी दिल्ली गाठत भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले.

१६ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात सीमाभागातील मोठ्या प्रमाणावरील मराठी भाषिक नागरिकांना केवळ कन्नड भाषेतील SIR फॉर्म समजण्यास अडचणी येत असून त्यामुळे अनेक मतदारांचे घटनात्मक मतदानाचे अधिकार बाधित होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मराठी भाषिक नागरिकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली होती.

कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवेदनाची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाला सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी SIR फॉर्म व निवडणुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना निवडणूक प्रक्रियेत अधिक सुलभता मिळणार असून त्यांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − 9 =

error: Content is protected !!