सीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौरा

सीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौरा

बेळगाव/उदगीर, १८ जुलै : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या लढ्याला नवे बळ देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने संघटनात्मक हालचालींना वेग दिला असून, समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी दोन दिवसीय बिदर-भालकी दौरा करून सीमाभागातील मराठी भाषिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दौऱ्यात सीमा प्रश्न, मराठी भाषिकांचे प्रश्न आणि आगामी आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दौऱ्यादरम्यान प्रकाश मरगाळे यांनी बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच सीमा प्रश्नासंदर्भातील ऐतिहासिक, कायदेशीर आणि दुर्मिळ दस्तऐवजांचा अभ्यास करून पुढील लढ्याची रणनीती निश्चित करण्याबाबत चर्चा केली.

यावेळी त्यांनी सीमाभागातील ज्येष्ठ नेते जीवनराव शिंदे, दिवंगत सचिव नवनाथ वासरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या सीमा चळवळीतील योगदानाला अभिवादन केले. तसेच समितीचे ज्येष्ठ नेते जाधव आणि सीमा लढ्याचे प्रणेते, माजी आमदार स्वर्गीय बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.

बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी, संघटनात्मक बळकटी, न्यायालयीन लढा तसेच आगामी आंदोलनाचा आराखडा यावर व्यापक चर्चा झाली. मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष अधिक संघटित, प्रभावी आणि तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या दौऱ्यामुळे सीमा लढ्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मराठी अस्मिता आणि सीमावासीयांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार या दौऱ्यातून व्यक्त करण्यात आला.

या दौऱ्यावेळी सुहास हुद्दार, पांडू पट्टण, मारुती मरगाणाचे, सुनील आनंदाचे, महादेव मंगणाकर, लक्ष्मण मेणसे, उमेश पाटील आणि वैभव मरगाणाचे हे उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + 15 =

error: Content is protected !!