सीमा लढा निर्णायक टप्प्यावर; महाराष्ट्र सरकारकडून सकारात्मक भूमिकेची अपेक्षा : प्रकाश मरगाळे

सीमा लढा निर्णायक टप्प्यावर; महाराष्ट्र सरकारकडून सकारात्मक भूमिकेची अपेक्षा : प्रकाश मरगाळे

उदगीर, प्रतिनिधी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील सहा दशकांहून अधिक काळ सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, या संघर्षात महाराष्ट्र सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. सरकारने अलीकडे घेतलेल्या बैठकीत सकारात्मकता दाखविल्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

उदगीर येथील छत्रपती राजे शिवाजी महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव पृथ्वीराज पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष भास्करराव कुलकर्णी, किशनराव पाटील इंचूरकर, विठ्ठलराव बागदे, किशनराव पाटील मुर्कीकर आणि राजकुमार पाटील उपस्थित होते.

मरगाळे म्हणाले की, बेळगावसह ८६५ मराठी भाषिक गावे कर्नाटकात गेल्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्षांनी सीमा लढ्याला ठाम पाठिंबा दिला होता. मात्र, १९८६ नंतर या प्रश्नावरील राजकीय तीव्रता कमी झाली असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचा संघर्ष अखंड सुरू आहे. समितीच्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारकडून खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रीय पक्षांकडून समितीच्या कार्यकर्त्यांना विविध आमिषे दाखवून संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा करत त्यांनी युवकांनी सीमा लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. सीमा प्रश्नाची तीव्रता आजच्या लोकप्रतिनिधींना समजावून सांगण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत किशनराव पाटील यांनी कर्नाटक सरकार मराठी भाषिकांना सापत्न वागणूक देत असल्याची खंत व्यक्त केली, तर विठ्ठलराव बागदे यांनी सीमाभागातील वयोवृद्ध कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल होत असल्याची टीका केली. नारायण पाटील कोरेकलकर यांनी सीमाभागातील मुलींना महाराष्ट्रात मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

प्रास्ताविकात पृथ्वीराज पाटील यांनी सीमा लढ्यात आता तिसरी पिढी सहभागी असून सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. यावेळी दिनेश मुदाळे, सतीश वासरे आणि सिद्धेश्वर लांडगे यांनीही मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, सीमा लढ्याचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय बापूसाहेब पाटील एकंबेकर आणि स्वर्गीय दीपक दळवी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपक दळवी यांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौनही पाळण्यात आले.

कार्यक्रमाला बेळगावसह सीमाभागातील सुहास हुद्दार, पांडू पट्टण, मारुती मरगाणाचे, सुनील आनंदाचे, महादेव मंगणाकर, लक्ष्मण मेणसे, उमेश पाटील, वैभव मरगाणाचे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद खोंडे यांनी, तर आभार प्रा. डी. आर. पाटील यांनी मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + seventeen =

error: Content is protected !!