जिमखाना क्लबमध्ये रमी खेळत असताना गोळीबार; सुरेश जलगारा थोडक्यात बचावले

जिमखाना क्लबमध्ये रमी खेळत असताना गोळीबार; सुरेश जलगारा थोडक्यात बचावले

बेळगाव : शहरातील जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री थरारक गोळीबाराची घटना घडली. रमी खेळत असलेल्या सुरेश जलगारा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी हल्लेखोरांना ढकलून दिल्याने ते थोडक्यात बचावले. संपूर्ण घटना क्लबमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जण जिमखाना क्लबमध्ये आले होते. त्यापैकी दोघे बाहेर थांबले, तर तिघे आत जाऊन सुरेश जलगारा यांच्याशी वाद घालू लागले. यावेळी एका आरोपीने पिस्तूल काढून जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र जलगारा यांनी प्रसंगावधान राखत आरोपीला ढकलून दिल्याने पहिला प्रयत्न फसला.

त्यानंतर आरोपींनी दोन गोळ्या झाडत घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात जलगारा यांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी ते प्रचंड हादरले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच एसओसीओ (Scene of Crime) पथकाने घटनास्थळाची तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले.

प्राथमिक चौकशीत सुरेश जलगारा यांनी हा हल्ला पूर्वी झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेचा सूड असल्याचा दावा केला आहे. प्रफुल्ल पाटील यांच्या साथीदारांनी आपल्यावर हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र पोलिसांनी या आरोपांना अद्याप दुजोरा दिलेला नसून, हल्ल्यामागील नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होईल, असे सांगितले.

सुरेश जलगारा यांना पुढील चौकशीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पाचही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू असून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 19 =

error: Content is protected !!