बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील अट्टल आंतरराज्य घरफोडी टोळीतील दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 4 लाख 18 हजार 800 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
- मोहन दौलतराव मुंडे (वय 33), क्रांतीनगर, अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र)
- श्याम साहेबराव जाधव (वय 30), अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र)
पोलिसांनी आरोपींकडून 1,617 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत ₹3,88,800) तसेच सुमारे ₹30,000 किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ₹4,18,800 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात या दोघांविरुद्ध महाराष्ट्रातील बीड, लातूर, पुणे, विजापूर आदी ठिकाणच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये 50 हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. या आरोपींनी कर्नाटकातही घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली असून, बेळगाव पोलिसांच्या कारवाईमुळे आणखी अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.
