“कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद” – डॉ. उमेश कळेकर:

“कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद” – डॉ. उमेश कळेकर:

शब्दगंध कवी मंडळ संघ व राज्य मराठी विकास संस्थेतर्फे कालिदास दिनानिमित्त ‘कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म’ विषयावर व्याख्यान:

बेळगाव (प्रतिनिधी): “कविता सृजनाची प्रक्रिया अत्यंत गूढ असून कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद आहे. संत तुकाराम, कबीर यांच्यापासून ते आजच्या समकालीन कवींंपर्यंत समाजप्रबोधनासाठी कवितेचा प्रभावी वापर होत आला आहे. कवीने समाज, निसर्ग आणि आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे कलात्मक, संवेदनशील आणि चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, समीक्षक व व्याख्याते डॉ. उमेश कळेकर यांनी केले.

शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कालिदास दिनानिमित्त शाहिद भगतसिंग सभागृहात आयोजित “कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म” या विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते.

प्रारंभी कवी परशराम खेमाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते डॉ. उमेश कळेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या व्याख्यानात डॉ. कळेकर यांनी कविता लेखनाची प्रक्रिया, कवीची संवेदनशीलता, अनुभवांचे कलात्मक रूपांतर आणि अभिव्यक्तीचे महत्त्व यांचा सखोल उहापोह केला. त्यांनी स्वतःच्या “कवितेचा गाव”, “पाऊस” आणि “इलेक्शन” या कवितांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थित रसिकांची दाद मिळवली. विशेषतः “इलेक्शन” या कवितेद्वारे त्यांनी देशातील राजकीय वास्तवावर मार्मिक भाष्य केले.

अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी बेळगावच्या समृद्ध मराठी साहित्यपरंपरेचा गौरव करत शब्दगंध कवी मंडळ संघ गेली अनेक दशके मराठी भाषा, साहित्य आणि काव्यसंस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्यिक उपक्रमांद्वारे मराठी साहित्याचा वारसा पुढे नेणे ही संघाची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. शिवाजीदादा कागणीकर, प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील, प्रा. स्वरूपा इनामदार, रेखा गद्रे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, स्मिता किल्लेकर, अस्मिता अळतेकर, नेहा जोशी, मंदाकिनी देसाई, सागर मरगाणाचे यांच्यासह अनेक कवी, साहित्यप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कनबरकर यांनी केले, तर जितेंद्र रेडेकर यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − two =

error: Content is protected !!