मुसळधार पावसामुळे सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षक भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

मुसळधार पावसामुळे सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षक भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

बेळगाव : प्रतिनिधी

शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता विविध ठिकाणी बसू लागला असून, शहापूर परिसरातील नाथ पै सर्कल येथील सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षक भिंत आज अचानक कोसळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाला होता. त्यामुळे आज दुपारच्या सुमारास ही भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुदैवाने घटना घडली त्यावेळी परिसरात नागरिकांची वर्दळ कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भिंत कोसळल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले असून, परिसरात काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच परिसरातील धोकादायक बांधकामांची तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच जीर्ण व धोकादायक इमारती आणि संरक्षक भिंतींपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + eighteen =

error: Content is protected !!