बेळगावात रविवारी नाथपंथी रावळ समाजाचे राज्यस्तरीय संमेलन

बेळगावात रविवारी नाथपंथी रावळ समाजाचे राज्यस्तरीय संमेलन

बेळगाव : नाथपंथी रावळ समाजाच्या एकजुटीला बळकटी देत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बेळगाव येथे रविवारी, ५ जुलै रोजी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहापूर येथील नाथ पै चौकातील श्री अंबाबाई मंदिर परिसरात होणाऱ्या या संमेलनाला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील नाथपंथी रावळ समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नाथपंथाच्या परंपरेचा वारसा जपणारा रावळ समाज देशभर विविध नावांनी विखुरलेला असून, नाथपंथी, रावळ, रावळभिल्ल, भिल्ल, हणगी, कपाली, शिवजोगी, बळेगार, बुवा, डवरी आणि जोगी अशा विविध घटकांमध्ये समाज विभागला गेला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागे राहिलेल्या समाजाला एकत्र आणून त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कर्नाटकात रावळ समाजाचा समावेश मागासवर्गीय अल्पसंख्याक प्रवर्गात असून, समाजाचा शैक्षणिक टक्का अत्यंत कमी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. समाजाच्या विकासासाठी संघटन, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधन या विषयांवर संमेलनात विशेष भर दिला जाणार आहे.

शहापूर येथील प्राचीन श्री काळभैरवनाथ मंदिर हे नाथपंथी रावळ समाजाचे केंद्रस्थान मानले जाते. या मंदिराच्या ट्रस्टतर्फे संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, समाजहिताचे विविध ठराव मंजूर केले जाणार आहेत. तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि समाजबांधवांकडून जोरदार तयारी सुरू असून, तीन राज्यांतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × four =

error: Content is protected !!