निपाणी : समाधी मठ ते देवचंद कॉलेज रोड या प्रमुख मार्गावरील स्ट्रीट लाईट यंत्रणेची दुरवस्था समोर आली असून, अनेक ठिकाणी पोल नसणे, एलईडी दिवे बंद पडणे तसेच वाकलेल्या पोलांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
संस्थेच्या निवेदनानुसार, बाळुमामा कमान आणि धारवाड कृषी फार्म परिसरात दोन ठिकाणी स्ट्रीट लाईटचे पोल काढण्यात आले किंवा पडल्यामुळे हटविण्यात आले, मात्र आजपर्यंत ते पुन्हा बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या भागात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याशिवाय, जानेवारी २०२६ मध्ये लाखो रुपये खर्च करून संपूर्ण एलईडी स्ट्रीट लाईट बदलण्यात आले होते. मात्र, नव्याने बसविण्यात आलेल्या अनेक एलईडी दिव्यांपैकी बरेच दिवे अल्पावधीतच बंद पडले आहेत. या दिव्यांना दोन वर्षांची हमी असतानाही दोषी दिवे बदलण्याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही ठिकाणी स्ट्रीट लाईटचे पोल वाकलेल्या अवस्थेतच उभे असून ते अपघातास कारणीभूत ठरू शकतात. तसेच वारंवार छायाचित्रांसह तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची नाराजी संस्थेने व्यक्त केली आहे.
फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनने संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नसलेले पोल बसवावेत, बंद एलईडी दिवे हमीअंतर्गत बदलावेत, वाकलेले पोल दुरुस्त करावेत आणि प्रलंबित कामांची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही संस्थेने व्यक्त केली आहे.
