सीमाकवी रवींद्र पाटील यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान

सीमाकवी रवींद्र पाटील यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान

बेळगाव: शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सीमाकवी रवींद्र मारुती पाटील (बेळगाव) यांना प्रतिष्ठेचा ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

कोल्हापूर येथील दसरा चौकात १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित पहिल्या अखिल भारतीय **’लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे’**मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकर अंदानी (अहिल्यानगर) होते. पद्मश्री उदय देशपांडे आणि माजी सभापती अक्काताई नलवडे यांच्या हस्ते रवींद्र पाटील यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी साहित्य संवाद परिषदेचे उद्घाटक म्हणूनही उपस्थिती लावली.

सीमाकवी, पत्रकार, तंत्रस्नेही शिक्षक, गीतकार, समालोचक, निवेदक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख असलेले रवींद्र पाटील हे बेळगाव सीमाभागातील कुद्रेमानी गावचे सुपुत्र असून, सध्या राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठी भाषा, साहित्य आणि सीमाप्रश्नांवरील त्यांच्या कार्यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या लेखणीतून साकारलेले ‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ हे गीत सीमावासीयांच्या भावना प्रभावीपणे व्यक्त करणारे ठरले असून, ‘सीमालढा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटकचे राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी बेळगाव येथे सलग सात वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले आहे. तसेच बडोदा, दिल्लीसह विविध राष्ट्रीय साहित्य संमेलनांमध्ये कवी म्हणून सहभाग नोंदवत त्यांनी सीमाभागातील मराठी साहित्याचा आवाज देशभर पोहोचवला आहे.

शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना यापूर्वीही दहा हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सीमाभागातील शिक्षक, साहित्यिक, पत्रकार आणि विविध सामाजिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =

error: Content is protected !!