बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मूलभूत अधिकारांचे होत असलेले कथित उल्लंघन, मराठी कार्यकर्त्यांवरील कारवाया तसेच भाषिक अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र एकीकरण युवासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. विठ्ठल आदित्य यांच्याशी चर्चा केली.
मूळचे लातूर येथील असलेले आणि सध्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे ॲड. विठ्ठल आदित्य यांनी बेळगावला धावती भेट दिली असता महाराष्ट्र एकीकरण युवासमिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भातील विविध न्यायालयीन बाबींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमावादासह सीमाभागातील मराठी कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाकडून लक्ष्य केले जाते, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, अशा तक्रारींची माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामार्फत न्याय मिळविण्याच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली.
युवासमितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने अनेक वेळा सूचना देऊनही सीमाभागातील भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने आयोगाला केवळ सूचना देण्यापुरते अधिकार न राहता थेट प्रशासनावर कारवाई करण्याचे अधिकार मिळावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा देता येईल का, यावरही चर्चा झाली.
रिट याचिका ही संविधानाने नागरिकांना दिलेली विशेष कायदेशीर तरतूद असून मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी नागरिकांना थेट सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात दाद मागता येते. सरकार, सरकारी संस्था किंवा अधिकारी यांनी नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्यास अथवा कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यास न्यायालयाकडून आदेश मिळविण्यासाठी रिट याचिका दाखल केली जाते. भारतीय संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी नागरिकांना थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे.
यावेळी ॲड. विठ्ठल आदित्य यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे लढा देण्याचे आश्वासन दिले. तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अधिकारांबाबतही आवश्यक कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवासमिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील तसेच ॲड. विठ्ठल आदित्य यांचे सहकारी उपस्थित होते.
