बेळगाव : रविवार पेठ परिसरातील काही व्यापाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर ज्येष्ठ उद्योजक व चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी यांनी संबंधित प्रभागाचे नगरसेवक, शहर महापालिका आयुक्त तसेच आरोग्य विभागाकडे कचरा समस्येबाबत पाठपुरावा केला.
या पाठपुराव्यानंतर संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून परिसराची साफसफाई करण्यात आली. मात्र, साफसफाईनंतरही काही व्यापाऱ्यांकडून दुकानांमधील कचरा, प्लास्टिक आणि इतर टाकाऊ साहित्य पुन्हा त्याच ठिकाणी टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होत असून स्वच्छता उपक्रमावर पाणी फेरले जात आहे. विकास कलघटगी यांनी सर्व संबंधित व्यापाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आणि रविवार पेठ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच शहर महापालिकेने या ठिकाणाची ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून नोंद घेऊन तेथे तात्पुरत्या सिमेंटच्या बसण्याच्या बाकांची उभारणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा बसेल आणि परिसराचे सौंदर्यही वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
