पद्मश्री नाना चुडासमा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पद्मश्री नाना चुडासमा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव : पद्मश्री नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स मेन बेळगाव आणि जायंट्स सखी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने के. एल. ई. डॉ. प्रभाकर कोरे रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श घालून दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री नाना चुडासमा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जायंट्स मेन बेळगावचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन केले.

के. एल. ई. डॉ. प्रभाकर कोरे रक्तपेढीचे प्रमुख श्रीकांत विरगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या आहार, आरोग्यदायी सवयी आणि घरगुती उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक महिला रक्तदानासाठी उत्सुक असूनही हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तदान करू शकल्या नाहीत. अशा महिलांनी आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, गूळ, खजूर, डाळिंब, गव्हांकुर तसेच लोहयुक्त पदार्थांचा समावेश करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जायंट्स सखी बेळगावच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी आपल्या मनोगतात महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहून हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. रक्तदान ही केवळ सेवा नसून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतगेकर, अशोक हलगेकर तसेच जायंट्सचे माजी अध्यक्ष मदन बामणे आणि विजय बन्सुर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान करणाऱ्यांमध्ये अरुण काळे, सुनील मुतगेकर, मदन बामणे, अशोक हलगेकर, सुनील पवार, जीवन कदम, महेश बामणे, श्याम जाधव, सुलक्षणा शिनोळकर, अक्षय जाधव, रोहित चव्हाण, प्रदीप चव्हाण, सुनील मुरकुटे, महादेव केसरकर आणि राहुल बेलवलकर यांचा समावेश होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरामुळे रक्तपेढीच्या साठ्यात मोलाची भर पडली असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी जायंट्स मेन बेळगाव आणि जायंट्स सखी बेळगाव यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − fourteen =

error: Content is protected !!