बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक मंगळवार, १६ जून रोजी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी २२ जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कन्नडसक्ती विरोधी महामोर्चाला युवा समितीने जाहीर पाठिंबा दर्शविला.
बैठकीत कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करताना मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच वेळोवेळी शुभम शेळके यांना बेळगाव पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या नोटिसांचा निषेध व्यक्त करत मराठी समाजाने लढणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले.
सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी कर्नाटक सरकारवर टीका करताना सीमाभागात १५ टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक वास्तव्यास असतानाही मराठी भाषेला योग्य स्थान दिले जात नसल्याचा आरोप केला. कर्नाटक सरकारने स्वतःच्या कायद्यांचे उल्लंघन करून कन्नडसक्ती लागू केली असून, याचा जाब २२ जूनच्या मोर्चातून विचारला जाईल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शुभम शेळके यांनी काही मराठी व्यापारी प्रशासनाच्या दबावामुळे आपल्या आस्थापनांवर मराठीला स्थान देत नसल्याची खंत व्यक्त केली. तर दुसरीकडे काही कन्नड व्यापारी स्वतःच्या भाषेबरोबर मराठीचाही सन्मान करत असल्याचे नमूद करून, मराठीला स्थान देणाऱ्या दुकानांमधूनच व्यवहार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच २२ जूनचा मोर्चा यशस्वी करून मराठी समाजाची एकजूट आणि ताकद प्रशासनाला दाखवून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवाजी हवळाणाचे व रणजित हवळाणाचे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सुरज जाधव, अभिजित मजुकर, निलेश काकतकर, रोहित जाधव, मोहन धाकलुचे, रोशन पाटील, प्रणय पाटील, परशराम निलजकर, प्रशांत बैलूरकर, प्रभाकर पाटील, श्रीराम पाटील, यश राव, गणेश घवारी, वेदांत पवार, विनायक, प्रतीक पट्टण, प्रविण मजुकर, अमर पाटील, सुरज अनगोळकर, अभिषेक कारेकर, दीपक कालकुंद्री, प्रणित जाधव, अक्षय पाटील, नागेश सरप, रोहन खांडेकर, शुभम देसुरकर आदी उपस्थित होते.
