सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी गाव पुन्हा संघटित; मोर्चे व आंदोलनात मोठ्या सहभागाचा निर्धार
येळ्ळूर, दि. १५ : सीमा प्रश्नाच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी आणि सेक्रेटरीपदी प्रकाश अष्टेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी (दि. १४) यरमाळेजवळील जाधव फार्महाऊस येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या कार्यकारिणीला संपूर्ण गावाच्यावतीने एकमुखी पाठिंबा देण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी वामन पाटील होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी मोर्चामध्ये येळ्ळूरमधून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबतही चर्चा झाली.
सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी येळ्ळूर गावाने नेहमीच आघाडीची भूमिका बजावली असून यापुढेही गाव संघटित ठेवून समितीच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यक्रम राबविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

समितीच्या पुनर्रचनेसाठी गठित करण्यात आलेल्या १६ सदस्यीय समितीने नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी, उपाध्यक्षपदी राजू पावले व प्रदीप देसाई, सेक्रेटरी म्हणून प्रकाश अष्टेकर, उपसेक्रेटरी म्हणून बी. एन. मजुकर व उदय जाधव, खजिनदारपदी सतीश शिवाजी पाटील, तर उपखजिनदार म्हणून नागेंद्र पाखरे आणि डॉ. विवेक मेणसे यांची निवड करण्यात आली.
हिशोब तपासणी समितीवर अनिल हुंदरे, सतीश मल्हारी देसूरकर आणि प्रा. सी. एम. गोरल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सूरज गोरल, दयानंद उघाडे, नागेश बोबाटे, यल्लुप्पा पाटील, सतीश कुगजी, श्रीकांत नांदुरकर, धाकलू करविनकोप, गणेश अष्टेकर यांच्यासह २१ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी समितीचे दिवंगत नेते व कार्यकर्ते कै. अर्जुन गोरल, कै. यल्लापा मोनापा गोरल, कै. कुम्माणा गोरल, कै. मोनाका महादेव गोरल, कै. यल्लापा दुद्दापा कुगजी, कै. शिवाजी अमृत पाटील, कै. के. एल. हुंदरे आणि कै. बी. बी. पाटील यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उदय जाधव, अनिल हुंदरे आणि डी. जी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीस दौलत कुगजी, चांगदेव परीट, शिवाजी पाटील, महेश जुवेकर, शिवाजी कदम, विठ्ठल कुरंगी, प्रशांत पाटील, अजित गोरल, नेताजी गोरल यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वामन पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नव्या कार्यकारिणीमुळे येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
