सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या बेळगाव चॅप्टरचे दिमाखात उद्घाटन; मराठी उद्योजकांसाठी प्रगतीची नवी दारे खुली

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या बेळगाव चॅप्टरचे दिमाखात उद्घाटन; मराठी उद्योजकांसाठी प्रगतीची नवी दारे खुली

बेळगाव, प्रतिनिधी :
मराठी उद्योजकांना एकत्रित आणून त्यांच्या व्यवसायाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT) च्या नव्या बेळगाव चॅप्टरचे उद्घाटन नुकतेच टिळकवाडी येथील ट्रीहाऊस हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या नव्या चॅप्टरमुळे बेळगाव व परिसरातील उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना नेटवर्किंग, मार्गदर्शन आणि व्यवसायवृद्धीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यास सॅटर्डे क्लबचे Secretary General सुहास फडणीस, Deputy Secretary General महेश इनामदार, Region Head योगेश देशपांडे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुधीर चव्हाण, गडहिंग्लज Region Head जितेंद्र रननावरे तसेच Deputy Region Head डॉ. संदीप पाटील यांच्यासह बेळगावातील अनेक नामवंत उद्योजक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सॅटर्डे क्लबच्या कार्याचा आढावा घेत मराठी उद्योजकांनी एकमेकांच्या सहकार्याने व्यवसाय वाढविण्याची गरज अधोरेखित केली. “मराठी माणसाने केवळ नोकरीकडे न पाहता स्वतःचा व्यवसाय उभा करावा आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून तो अधिक सक्षम करावा, हा सॅटर्डे क्लबचा मूलभूत उद्देश आहे. बेळगाव चॅप्टरच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

नेटवर्किंग, मार्गदर्शन आणि व्यवसायवृद्धीवर भर

बेळगाव चॅप्टरच्या माध्यमातून उद्योजकांना परस्पर सहकार्याचे मजबूत व्यासपीठ उपलब्ध होणार असून, अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि रेफरल सिस्टीमद्वारे व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. सॅटर्डे क्लबच्या बैठका महिन्यातून दोन वेळा आयोजित केल्या जाणार असून त्यातून सदस्यांमध्ये व्यावसायिक संबंध अधिक दृढ होणार आहेत.

क्लबच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा

यावेळी बेळगाव चॅप्टरची CST (Core Support Team) जाहीर करण्यात आली. त्यामध्ये:

  • Chairperson : श्री रोहन कुंडेकर
  • Secretary : श्री प्रथमेश कारेकर
  • Treasurer : सौ. दीपाली वनकुंद्रे

यांची निवड करण्यात आली.

उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव चॅप्टरच्या उद्घाटनाला मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बांधकाम, सेवा आणि किरकोळ व्यवसाय क्षेत्रातील अनेक उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकमेकांची स्पर्धा करण्याऐवजी परस्पर सहकार्य आणि व्यवसाय वृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जोतिबा कडेमनी व डॉ. अमोल पाटील यांनी केले. उत्साह, सकारात्मकता आणि उद्योजकतेच्या नव्या संकल्पनांनी भारलेल्या वातावरणात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बेळगावातील उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी ही एक महत्त्वाची आणि आशादायी सुरुवात मानली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 19 =

error: Content is protected !!