बेळगाव : महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला गती मिळावी आणि महाराष्ट्र सरकारने अधिक प्रभावीपणे पाठपुरावा करावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली.
कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा केली. यावेळी सीमाभागातील विविध प्रश्न तसेच सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या सद्यस्थितीची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली.
शिष्टमंडळाने २९ जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाची माहितीही पवार यांना दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उच्चाधिकार समिती आणि तज्ज्ञ समितीची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पवार यांनी दिल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीत बेळगावसह सीमाभागात कन्नड सक्तीच्या अंमलबजावणीमुळे मराठी भाषिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना आणि स्थानिक परिस्थितीची माहिती शिष्टमंडळाने पवार यांच्यासमोर मांडली.
सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकारने सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा प्रभावी युक्तिवाद करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सुहास हुद्दार, उमेश पाटील आणि विनोद अंबेवाडीकर यांचा समावेश होता.
