बेळगाव, दि. २ जून : पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे “झाडे लावा, झाडे जगवा” या उपक्रमांतर्गत स्केटिंग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक नितीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
गोवा वेस येथील स्विमिंग पूल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत स्केटर्सनी स्केटिंग करत नागरिकांना झाडे लावण्याचे व त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. “झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी नगरसेवक नितीन जाधव यांनी उपस्थितांना संबोधित करताना प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याची नियमित निगा राखावी, असे आवाहन केले. झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते तसेच सावली, फुले, फळे आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे मानवी जीवन अधिक समृद्ध आणि निरोगी बनते, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात प्रसिद्ध चित्रकार वसंत निर्मळे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसने, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, मिसेस महत, समीर महत, करुणा वाघेला, विजय नाईक, तुलसी हिंडलगेकर तसेच बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या स्केटर्समध्ये प्राणिका मोटेकर, कुलदीप बिर्जे, प्रांजल पाटील, सत्यम पाटील, जानवी तेंडुलकर, आशिष अंगडीकर, श्रेयस बजंत्री, आदर्श नाईक, रचित नांगरे, राजवीर कदम, प्रीतम बागेवाडी आणि सार्थक चव्हाण यांचा समावेश होता.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या अनोख्या स्केटिंग रॅलीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. झाडांचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
