स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वंकष लढ्याची घोषणा

स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वंकष लढ्याची घोषणा

निपाणी : स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम यांच्या कुटुंबीयांवर दहा वर्षांपूर्वी झालेल्या अन्याय व हल्ल्याच्या घटनेप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही ठरविण्यासाठी आज चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वंकष लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेब मगदूम यांनी गेल्या दहा वर्षांतील संघर्षाचा आढावा घेतला. या काळात विविध स्तरांवर सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्राचार्य डॉ. अच्युत माने म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून विविध स्तरांवर पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता बेळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार आहे.”

बैठकीत संमत करण्यात आलेल्या ठरावात नमूद करण्यात आले की, “अन्यायग्रस्त स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम कुटुंबाला दहा वर्षे उलटूनही न्याय मिळालेला नाही. यासाठी शासन आणि न्यायव्यवस्था हे दोन्ही घटक जबाबदार आहेत. या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध सर्वंकष लढा उभारण्यात येणार असून, याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करण्यात येईल.”

या ठरावाचे सूचक प्रा. एन. आय. खोत तर अनुमोदक जयराम मिरजकर होते.

चिंतन बैठकीस जयराम मिरजकर, प्रा. एन. आय. खोत, विठ्ठल वाघमोडे, सुधाकर माने, संजीवकुमार शितोळे, अशोक खांडेकर, आनंद संकपाळ, विश्वनाथ किल्लेदार, सुनील माने तसेच मगदूम कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + ten =

error: Content is protected !!