विविध चोरी व दरोडा प्रकरणांतील 10 अट्टल आरोपींना अटक; अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

विविध चोरी व दरोडा प्रकरणांतील 10 अट्टल आरोपींना अटक; अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

खानापूर : खानापूर पोलिसांनी विविध चोरी व दरोडा प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 10 अट्टल आरोपींना अटक करून मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त तपास आणि शोध मोहिमेनंतर ही यशस्वी कारवाई करण्यात आली. आरोपींकडून अनेक गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळाली असून आणखी अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

खानापूर तालुक्यासह बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत घरफोडी, चोरी आणि दरोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी डीवायएसपी विरय्या हिरेमठ आणि खानापूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक लालसाब गवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके स्थापन करण्यात आली होती.

तपासादरम्यान महाराष्ट्र, गोवा तसेच इतर राज्यांमध्येही शोधमोहीम राबविण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 10 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली असून विविध चोरी आणि दरोड्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

  1. रबिऊल रोहूल आमीन गाजी (वय 29) – मूळ पश्चिम बंगाल, सध्या दाणे गल्ली, शहापूर, बेळगाव
  2. अलीहसन कबिरुद्दीन मंडल (वय 27) – मूळ पश्चिम बंगाल, सध्या भारतनगर, खासबाग, बेळगाव
  3. सादिक अब्दुल रेहमान तोरसल (वय 30) – अळवण गल्ली, शहापूर, बेळगाव
  4. विवेक चंद्रकांत पाटील (वय 33) – महार रोड, तांगडी गल्ली, बेळगाव
  5. प्रशांत महादेव चव्हाण (वय 30) – कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली, बेळगाव
  6. नितीन राजाराम चव्हाण (वय 36) – गायत्रीनगर, खासबाग, बेळगाव
  7. दिगंबर नागेश पाटील (वय 26) – शिवशक्तीनगर, अनगोळ, बेळगाव
  8. मयूर राजू घाडी (वय 26) – बसवाण गल्ली, शहापूर, बेळगाव
  9. तसेच आणखी दोन आरोपींनाही अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून अनेक घरफोडी व दरोडा प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींकडून दरोड्यातील सोन्याचे दागिने, दरोड्यात वापरलेली पिस्तूल आणि इतर साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे खानापूर परिसरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − 11 =

error: Content is protected !!