महाराष्ट्र एकीकरण समितीचे कणखर ज्येष्ठ नेते अर्जुनराव गोरल यांचे निधन

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कणखर ज्येष्ठ नेते अर्जुनराव गोरल यांचे निधन

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सीमाभागातील मराठी चळवळीतील बुलंद आवाज म्हणून परिचित असलेले अर्जुनराव नागोजी गोरल (वय ७७) यांचे गुरुवारी दि. २१ रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाने सीमाभागात शोककळा पसरली असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन चिरंजीव, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या शुक्रवार दि. २२ रोजी सकाळी १० वाजता मंगाई नगर येथील त्यांच्या पोल्ट्री फार्मजवळ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अर्जुनराव गोरल हे महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरचे आक्रमक व परखड नेते म्हणून ओळखले जात होते. सीमाप्रश्नाबाबत त्यांना सखोल जाण होती. समितीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मराठी भाषिकांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. आपल्या स्पष्ट व ठाम भूमिकेमुळे ते सीमाभागातील जनतेत विशेष लोकप्रिय होते.

येळ्ळूर तसेच परिसरातील मराठी भाषिक आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनात्मक कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. तालुक्यातील जनतेशी त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनामुळे सीमालढ्यातील एक कणखर नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 2 =

error: Content is protected !!