बेळगांव : गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.च्या स्केटर्सनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण 7 पदकांची कमाई केली. गोव्यातील चिंचणीम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 300 हून अधिक अव्वल स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत बेळगांवच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत 6 सुवर्ण व 1 कांस्य पदक जिंकून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
यामध्ये प्राणिका मोटेकर हिने 2 रौप्य व 1 कांस्य पदक पटकावले, तर आरशान माडीवाले याने 3 सुवर्ण पदके जिंकत दमदार कामगिरी केली. तसेच प्रीतम बागेवाडी यानेही 3 सुवर्ण पदके मिळवत आपला ठसा उमटवला.
हे सर्व स्केटर्स के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, विशाल वेसने, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत.
या यशासाठी खेळाडूंना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर आणि निखिल चिंडक यांचे प्रोत्साहन लाभत असल्याचे सांगण्यात आले.
