बेवारस कर्करोगग्रस्त रुग्णाला मानवतेचा अखेरचा निरोप; माजी महापौर विजय मोरे आणि CPI कालीमिर्ची यांनी केले अंत्यसंस्कार

बेवारस कर्करोगग्रस्त रुग्णाला मानवतेचा अखेरचा निरोप; माजी महापौर विजय मोरे आणि CPI कालीमिर्ची यांनी केले अंत्यसंस्कार

बेळगावातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा गंभीर तोंडाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर मानवतेचे हृदयस्पर्शी दर्शन घडले. काही दिवस उपचार सुरू असतानाही त्या व्यक्तीची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्याने प्राण सोडले.

मृत्यूनंतर त्याचा मृतदेह अनेक दिवस सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला होता. कदाचित एखादा नातेवाईक, कुटुंबीय किंवा परिचित व्यक्ती पुढे येईल, या आशेने प्रशासन वाट पाहत होते. मात्र दिवस उलटत गेले तरी त्या व्यक्तीला आपले म्हणणारे कोणीही पुढे आले नाही. आयुष्यभर वेदना आणि एकटेपणाशी झुंज देणारी ती व्यक्ती मृत्यूनंतरही बेवारस राहिली.

ही हृदयद्रावक परिस्थिती पाहून माजी महापौर आणि CPI कालीमिर्ची यांनी पुढाकार घेत मानवतेचे अनोखे उदाहरण घालून दिले. त्यांनी कोणतीही तमा न बाळगता संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि सदाशिवनगर स्मशानभूमीत जाऊन त्या मृत व्यक्तीवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले.

या वेळी मार्केट पोलीस स्टेशनच्या ESI सुजाता एम., पोलीस कॉन्स्टेबल निलेश अरमगावडे, निशार शमशेर, मार्केट पोलीस स्टेशनचे रायटर खानापुरे तसेच सदाशिवनगर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. सर्वांनी मिळून अत्यंत संवेदनशीलतेने आणि आदराने अंत्यविधी पार पाडला.

यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी पोलीस कर्मचारी आणि स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “एखादी व्यक्ती शेवटच्या प्रवासातही एकटी राहू नये, हीच खरी मानवता आहे,” असे त्यांनी सांगितले.

समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा संदेश देणारी ही घटना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे. मृत व्यक्तीला आपले कोणी नसले तरी समाजात अजूनही अशा संवेदनशील व्यक्ती आहेत, ज्या शेवटच्या क्षणीही माणुसकीची साथ देतात, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × three =

error: Content is protected !!