बेळगाव : शहरातील उद्यमबाग पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वापरण्यात आलेली मोटारसायकल तसेच पिकॅक्स जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मे 2026 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर , @COPBELAGAVI आणि @DCP_CT_Belagavi या खात्यांना टॅग करून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये काही युवक रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे दिसून आले होते.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत उद्यमबाग पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 56/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 126(2), 292, 352, 351(2) तसेच 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी परशुराम हुलेप्पा करकाळे (वय 21) आणि रामप्पा हुलेप्पा करकाळे (वय 24, दोघेही जैननगर, बेळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून सुमारे 35 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटारसायकल (क्रमांक KA22HX4512) तसेच पिकॅक्स जप्त करण्यात आली आहे.
तसेच आरोपींकडून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य न करण्याबाबत कायदेशीर हमीपत्रही घेण्यात आले असून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
