एपीएमसी पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी प्रकरणी तिघांना अटक, ४.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

एपीएमसी पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी प्रकरणी तिघांना अटक, ४.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, सोन्याचे आणि चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मे २०२६ रोजी एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत राहणारेअरुण जाधव हे फिर्यादी काही कामानिमित्त आपल्या कुवेंपु नगर येथील घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून त्यामधील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून पोबारा केला होता. घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून १ लाख ६७ हजार १८६ रुपये रोख रक्कमचे १२.०८० ग्रॅम सोन्याचे दागिने , १ लाख ८३ हजार ८८८ रुपये किमतीचे ७४४.५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवेंद्र उर्फ डेब्या रमेश वाघमोरे (वय ३९) , सचिन दत्तात्रय गवळी (वय ३९) आणि कपिल उर्फ आप्पा बजरंग जाधव (वय २३) यांचा समावेश आहे. तिघेही कोल्हापूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − six =

error: Content is protected !!