बेळगाव : शिक्षणाला प्रोत्साहन देत गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शांताई विद्या आधार संस्थेच्या वतीने दोन गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीची जबाबदारी स्वीकारण्यात आली. गोगटे कॉलेज येथील वेणुगोपाल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रतिभा पुरस्कार’ कार्यक्रमात ही मदत जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना फी सहाय्याचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शांताई विद्या आधार संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व आणि समाजाची विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी यावर भाष्य केले. तसेच विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी जुनी वर्तमानपत्रे व पुनर्वापर करता येणारे साहित्य (रद्दी) शांताई विद्या आधार संस्थेला दान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अशा उपक्रमांतून जमा होणाऱ्या निधीतून आणखी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत करता येईल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात शिरीष चिंचोळीमठ, गोगटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जलीहाल, विभागप्रमुख देशपांडे मॅडम, अॅलन विजय मोरे, गंगाधर पाटील, सूरज गावली आदी मान्यवरांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढे येण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. समुदायाच्या सहभागातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले.
