बेळगावातील कपिलेश्वर मंदिराजवळील कपिलानाथ तलाव परिसरात सातत्याने घडणाऱ्या अपघात आणि मृत्यूच्या घटनांची गंभीर दखल घेत प्रशासनाने तलाव परिसरात सार्वजनिक प्रवेशबंदी लागू केली आहे. नुकत्याच घडलेल्या भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
पोलीस प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत तलाव परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केला असून, ८ मे २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना येथे प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कपिलेश्वर मंदिरामागील कपिलानाथ तलाव अत्यंत जुना असून त्याची तटबंदी धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. या परिसरात दररोज अनेक नागरिक आणि लहान मुले पोहण्यासाठी येत असतात. ३ मे २०२६ रोजी तलावाची भिंत कोसळून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
खडेबाजार पोलिस ठाण्याच्या अहवालानुसार, २०१३ ते २०२६ या कालावधीत कपिलानाथ तलावात पडून १४ दुर्घटना घडल्या असून, एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तलाव परिसरात कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्याने भविष्यात आणखी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त यांनी तलाव परिसरात सार्वजनिक प्रवेशबंदीचे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार, मंदिर व्यवस्थापन आणि अधिकृत कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही तलाव परिसरात जाण्यास परवानगी राहणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच तलाव परिसरात कोणत्याही प्रकारचे जलक्रीडा उपक्रम आयोजित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
धार्मिक विधी आणि मंदिराशी संबंधित आवश्यक कामांसाठी मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे. खडेबाजार पोलिसांना परिसरात तातडीने सूचना फलक लावून नागरिकांना माहिती देण्याचे निर्देशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
