बेळगाव : प्रामाणिकपणाचा उत्तम आदर्श घालून देणारी घटना शहरात घडली असून बस वाहक व चालक यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मच्छे येथील रहिवासी चैत्राली संदीप वागोजी या बुधवार, दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी उद्यमबाग ते पिरणवाडी दरम्यान बसने प्रवास करत असताना त्यांची पर्स हरवली होती. संबंधित बस वायव्य कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बेळगाव येथील दुसऱ्या डेपोतील अनुसूची क्रमांक 108 (सीबीटी–तीर्थकुंडे मार्ग) वर धावत होती.
या बसमध्ये कर्तव्य बजावत असलेले वाहक श्री सिद्धप्पा हडलगी (बिल्ला क्रमांक 5454) व चालक श्री शिवानंद एस (चालक क्रमांक 425) यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली. बस सीबीटी येथे पोहोचल्यावर त्यांना पर्स आढळून आली. त्यांनी तत्काळ संबंधित महिलेचा संपर्क साधून त्यांना बोलावले आणि पर्स सुरक्षितरित्या सुपूर्द केली.
सदर पर्समध्ये सुमारे 7,380 रुपये रोख रक्कम, सोन्याचा नथ, कानातले तसेच मोबाईल असा मौल्यवान ऐवज होता.
या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वर्तनाबद्दल वाहक सिद्धप्पा हडलगी व चालक शिवानंद एस यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांनी दाखवलेली प्रामाणिकता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
