बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक करून तब्बल ११ लाख ७३ हजार रुपयांच्या २० दुचाकी जप्त केल्या आहेत.
२३ एप्रिल २०२६ रोजी दिलीप तुकाराम जाधव (रा. होनगा, ता. बेळगाव) यांनी आपली दुचाकी (क्र. KA-22/EY-6688) चोरीस गेल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक १०५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी विशेष पथक तयार करून २५ एप्रिल २०२६ रोजी तीन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१) फकीरप्पा सिद्धप्पा करिगार (वय २५, रा. हिरेहट्टी, ता. गोकाक)
२) रमेश प्रभू पाटील (वय २३, रा. आलदाळ, ता. हुक्केरी)
३) कमलप्पा उर्फ कमलु यल्लप्पा गुंडागोळ (वय ३८, रा. केचनट्टी, मार्कंडेय नगर)
चौकशीत आरोपींनी बेळगाव शहर व जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून यामाहा, हिरो, होंडा, टीव्हीएस, सुझुकी आदी कंपन्यांच्या एकूण २० दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ११,७३,००० रुपये आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नागणगौडा कत्तिमनगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पीएसआय संतोष दलवाई, पीएसआय लक्कप्पा जोडट्टी तसेच कर्मचारी सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, बाळेश पटनाड, सण्णप्पा हंचिनमनी, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल आणि अमित रूपनवर यांचा समावेश होता. तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव काशीद आणि दीपक डोडगौडी यांनीही सहकार्य केले.
या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे.
