बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी सांगली व कैगा येथे पार पडलेल्या स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत एकूण 12 पदकांची कमाई केली. या स्पर्धांमध्ये 300 हून अधिक अव्वल स्केटर्स सहभागी झाले होते.
या स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी 6 सुवर्ण आणि 6 कांस्य पदके पटकावत आपली छाप पाडली. सांगली येथील स्पर्धेत जानवी तेंडूलकर (1 सुवर्ण), अमिषा वेर्णेकर (1 रौप्य), सौरभ साळोखे (1 सुवर्ण), शल्य तरळेकर (1 सुवर्ण), प्राणिका मोटेकर (1 सुवर्ण) आणि आरशान माडीवाले (1 रौप्य) यांनी यश मिळवले.
कैगा येथील स्पर्धेत श्रेयश वजंत्री (2 सुवर्ण), सार्थक मार्दोळकर (1 सुवर्ण), सोहम वाघमारे (2 कांस्य) आणि रचित नांगरे (1 कांस्य) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
हे सर्व स्केटर्स केएलई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, विशाल वेसने, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.
या यशासाठी डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे. या कामगिरीमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
