बेळगाव : पत्नीच्या कपड्यांवरून झालेल्या वादातून संतापलेल्या पतीने तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 29 वर्षीय आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णाजी परशराम पाटील (रा. हट्टरवाड, ता. खानापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मजुरी करून उदरनिर्वाह करतो. ही घटना 19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास नंदगड येथील दुर्गानगरमधील भाड्याच्या घरात घडली.
पीडित मंजुळा (वय 27), गृहिणी असून तिचे आणि आरोपीचे लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. लग्नानंतरपासूनच तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेच्या दिवशी पत्नीने साडीऐवजी नाईटड्रेस घातल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद चिघळत गेल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या घटनेत मंजुळा हिला सुमारे 80 टक्के भाजल्या गेल्यामुळे गंभीर दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला गोवा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, बांबोळी येथे हलविण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या प्रकरणी पीडितेच्या आईने नंदगड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये, खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने पथक तयार करून आरोपीचा शोध घेतला व नंदगड बसस्थानकाजवळून त्याला अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
