शिवजयंती मिरवणुकीनिमित्त बेळगावात व्यापक वाहतूक बदल; 21 ते 22 एप्रिलदरम्यान विशेष व्यवस्था जाहीर

शिवजयंती मिरवणुकीनिमित्त बेळगावात व्यापक वाहतूक बदल; 21 ते 22 एप्रिलदरम्यान विशेष व्यवस्था जाहीर

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 21 एप्रिल 2026 रोजी शहरात पारंपारिक भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी 2 वाजल्यापासून 22 एप्रिलपर्यंत मिरवणूक समाप्त होईपर्यंत अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद किंवा वळविण्यात येणार आहे.

यंदाच्या मिरवणुकीचा मार्ग चन्नम्मा सर्कल, काकती वेस रोड, कॉलेज रोड, पिंपळ कट्टा, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनि मंदिर, कपिलेश्वर फ्लायओव्हर मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त होणार आहे.

या मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध भागांतील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे. खानापूरकडून येणारी वाहने एस.पी. ऑफिस मार्गे कृष्णदेवराय सर्कल, वाय-जंक्शन, सदाशिवनगर, गांधी सर्कल, शौर्य चौक मार्गे पुढे जाणार आहेत. काँग्रेस रोड, गोवा वेस आणि रेल्वे फ्लायओव्हरमार्गे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी देखील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

नाथपै सर्कल, बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्ली, गांधीनगर, हनुमान नगर, बक्साइट रोड आदी मार्गांचा वापर करून वाहनांना शहरातील मुख्य भाग टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्टेशन रोड, हेड पोस्ट ऑफिस परिसर, महाद्वार रोड, कपिलेश्वर परिसर याठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

21 एप्रिल दुपारी 2 वाजल्यापासून 22 एप्रिलपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना शहरात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मिरवणूक मार्गावरील सर्व रस्त्यांवर वाहनांची पार्किंग व वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. दोन लेनच्या रस्त्यांपैकी एक मार्ग मिरवणुकीसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, काही ठिकाणी संपूर्ण रस्ता मिरवणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.

वाहन पार्किंगसाठी शहरातील महिला पोलीस ठाण्याच्या मागील मोकळी जागा तसेच संभाजी मैदान, महाद्वार रोड येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

या विशेष व्यवस्थेमुळे शिवजयंतीची मिरवणूक सुरळीत व सुरक्षितपणे पार पडण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 🚩

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × one =

error: Content is protected !!