बेळगाव : कॉलेज रोड येथील यश ऑटो येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
या प्रसंगी विविध मान्यवरांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. राजेंद्र मुतगेकर यांनी आपल्या भाषणात जिजाऊंच्या संस्कारातून घडलेल्या शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाची महती सांगत योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. उद्योगपती महादेवराव चौगुले यांनी स्वच्छता, वेळेचे नियोजन आणि परिश्रम या गुणांमुळेच वैभव प्राप्त होते, असे सांगितले.
डी. बी. पाटील यांनी “शिवाजी द टाइम मॅनेजमेंट” या विषयावर प्रकाश टाकत शिवरायांच्या अष्टपैलू नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. शिवसंत संजय मोरे यांनी युवकांनी स्वतःशी स्पर्धा करत प्रगती साधावी, असा संदेश दिला. ज्येष्ठ सदस्य ईश्वर लगाडे यांनी शिवकार्याबद्दल मार्गदर्शन केले, तर विधिज्ञ ॲड. सुधीर चव्हाण यांनी एनसीईआरटी पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली.
या कार्यक्रमाला पी. जे. घाडी, एम. वाय. घाडी, हेमंत भोसले, राम ठोमरे, केदार मोटर्स, ईश्वर लगाडे, श्री बेळगांवकर, एम. के. पाटील, नागेश डेगसकर, अजित मोरे, राणोजी मोरे, डॉ. बेळगावकर यांच्यासह कामगार वर्ग आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
