गणेबैल टोल प्रकरण : कंपनी टर्मिनेट करण्याचा निर्णय; नवीन टेंडरची तयारी

गणेबैल टोल प्रकरण : कंपनी टर्मिनेट करण्याचा निर्णय; नवीन टेंडरची तयारी

बेळगाव : गणेबैल टोल प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून टोल चालवणाऱ्या कंपनीला टर्मिनेट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते प्रसाद पाटील यांनी दिली. आज एसी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

टोल कर्मचाऱ्यांवरील अन्यायाच्या पार्श्वभूमीवर परवाच डीसी आणि एसपी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज एसी श्रवण नाईक, NHAI चे पीडी भुवनेश कुमार शुक्ला, काँग्रेस नेते प्रसाद पाटील, तसेच कर्मचाऱ्यांचे वकील यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत टोल सुरू करण्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वयाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र टोल चालवणाऱ्या हुळे कंपनीच्या प्रतिनिधींनी सहकार्य न दाखवल्याने अखेर कंपनीला टर्मिनेट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, NHAI कडून लवकरच नवीन टेंडर काढून नव्या कंपनीकडे टोल संचालन सोपविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तोपर्यंत टोल व्यवस्था ‘ऑटो मोड’वर चालवली जाण्याची शक्यता आहे.

बैठकीत भूमिपुत्र टोल कर्मचाऱ्यांना दिलासा देत, नवीन कंपनी आल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर सामावून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने या प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. तालुक्यात कुणावरही अन्याय झाल्यास काँग्रेस त्याविरोधात लढा देत राहील, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते व इतर संबंधित घटकांनी मौन बाळगल्याची टीका करण्यात येत आहे. सुमारे ४० युवक-युवतींच्या नोकऱ्या धोक्यात असतानाही कोणीही पुढे न आल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांना सरसकट टोलमुक्तीचा लाभ मिळत असून, यापूर्वी काही मोजक्या लोकांनाच मिळणारा हा लाभ आता सर्वांसाठी खुला झाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + thirteen =

error: Content is protected !!