५८ वर्षांनंतर हंदीगनूरमध्ये श्री महालक्ष्मी यात्रोत्सव; मंडप उभारणी मुहूर्तमेढ सोहळा मोठ्या उत्साहात.

५८ वर्षांनंतर हंदीगनूरमध्ये श्री महालक्ष्मी यात्रोत्सव; मंडप उभारणी मुहूर्तमेढ सोहळा मोठ्या उत्साहात.

बेळगाव, दि. ११ : हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या उभारणीसाठी मुहूर्तमेढ सोहळा मंगळवार (दि. १० मार्च) रोजी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ५८ वर्षांनंतर हंदीगनूर तसेच परिसरातील म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, होसोळी, कट्टनभावी, कुरिहाळ खुर्द आणि कुरिहाळ बुद्रुक या सहभागी गावांच्या संयुक्त विद्यमाने श्री महालक्ष्मी देवीची भव्य यात्रा येत्या १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव मंडपाच्या उभारणीसाठी मुहूर्तमेढ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सहायक मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मुहूर्तमेढ सोहळ्यानंतर गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन केले. त्यानंतर मनीकेरी गावातून श्री महालक्ष्मी देवीच्या रथासाठी लागणारे साहित्य आणण्यात आले. गावातील विविध देवी-देवतांची विधीपूर्वक पूजा करून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात आणि मिरवणुकीच्या स्वरूपात मनीकेरी येथून रथासाठीचे साहित्य हंदीगनूर गावात आणण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमास यात्रा समितीचे अध्यक्ष गंगाधर पाटील, कलाप्पा कडोलकर, भैरवनाथ पाटील, दयानंद पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, बाबू तळवार, विजय कांबळे आदींसह सहभागी गावांतील ग्रामस्थ, महिला वर्ग, तरुण मित्रमंडळे, महालक्ष्मी यात्रा समितीचे सदस्य तसेच बाळगोपाळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, १४ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला असून परिसरातील भाविकांमध्ये यात्रेबाबत मोठा उत्साह आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 2 =

error: Content is protected !!