छ.शिवरायांना गांभीर्याने अभ्यासावे लागेल : प्राचार्य अरविंद पाटील

छ.शिवरायांना गांभीर्याने अभ्यासावे लागेल : प्राचार्य अरविंद पाटील

मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून खानापूरमध्ये ३९६ वी शिवजयंती उत्साहात

खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ युद्धनीतीत प्रावीण्य मिळवले नाही, तर समाजपरिवर्तनाचा दूरदृष्टीपूर्ण विचारही दिला. आजच्या विदारक परिस्थितीत समाजाला शिवरायांच्या शौर्यकथांइतकीच त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा गांभीर्याने अभ्यास करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन म.मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी केले.

खानापूर येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ३९६ वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.

प्राचार्य पाटील म्हणाले, शिवरायांनी आपल्या मावळ्यांना शेतकऱ्यांच्या गवताच्या पात्यालाही हात लावू नका, असा कडक आदेश दिला होता. तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा राजा म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार शिवरायांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्यात अत्यंत मोलाचे ठरले. मात्र आजच्या धावपळीच्या युगात आई-वडिलांना आपल्या लेकरांसाठी वेळ देता येत नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. मोबाईल आणि टीव्हीच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला शिवरायांच्या विचारांची दिशा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले, शिवरायांनी केवळ लढाया जिंकल्या नाहीत, तर स्वराज्याची संकल्पना रुजवली. परदेशी लेखक आणि विचारवंतांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना जगाच्या पाठीवर त्यांच्यासारखा राजा दुसरा झाला नसल्याचा उल्लेख केला आहे. मात्र आपल्या देशात आणि समाजात त्यांच्या विचारांची कितपत रुजवात झाली आहे, याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आगामी काळात शिवरायांचा विचार केवळ मिरवण्यापुरता न ठेवता तो समाजात प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही त्यांनी आवाहन केले.

यावेळी म.ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्षीय समारोप करताना नारायण कापोलकर यांनी सध्याची सामाजिक स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत समविचारी लोकांनी एकत्र येऊन सकारात्मक परिवर्तनासाठी कार्य करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमास म.ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, गर्लगुंजी कृषी पतसंस्थेचे माजी चेअरमन राजू सिद्धाणी, भाजप नेते भरमाणी पाटील, गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील, भाजप नेते मोहन पाटील, सदानंद मासेकर, राजू जांबोटकर, अरविंद शेलार, प्रा. जाधव, विनायक मुतगेकर, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे, नारायण भटवाडकर, नागेश कोलेकर, प्रतिष्ठानचे खजिनदार ईश्वर बोबाटे, सदस्य मऱ्याप्पा पाटील, विठ्ठल पाटील, बाबाजी पाटील, ऋतिक कुंभार आदींसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव प्रल्हाद मादार यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल चेतन लक्केबैलकर यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − five =

error: Content is protected !!