बेनकनहळ्ळी परिसरात कौटुंबिक वादातून दोन गटांत भीषण हाणामारी; सात जण ताब्यात, वाहनं जप्त,मध्यस्थी करणाऱ्या गावातील तरुणांना देखील मारहाण केल्याने वातावरण चिघळले

बेनकनहळ्ळी परिसरात कौटुंबिक वादातून दोन गटांत भीषण हाणामारी; सात जण ताब्यात, वाहनं जप्त,मध्यस्थी करणाऱ्या गावातील तरुणांना देखील मारहाण केल्याने वातावरण चिघळले

बेळगाव: बेनकनहळ्ळी परिसरात कौटुंबिक वादाचे रूपांतर दोन गटांतील भीषण हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. सांगली येथील एका कुटुंबावर काही तरुणांच्या टोळक्याने घरात घुसून हल्ला केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेनकनहळ्ळी येथे राहणाऱ्या अविनाश साळुंखे यांच्या घरी सोमवारी रात्री सांगली, मूचंडी आणि मुत्यनट्टी येथील काही तरुणांनी बेकायदेशीररीत्या प्रवेश करत गोंधळ घातला. अविनाश साळुंखे यांच्या बहिणीचा पती दीपक याच्यासोबत सुरू असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जाते. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या तडजोडी फिस्कटल्याने संतप्त झालेल्या संबंधित तरुणांनी साळुंखे कुटुंबावर हल्ला चढवला.

या मारहाणीत अविनाश साळुंखे, बालाजी साळुंखे आणि मीना नाईक हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गावामध्ये वाढत चाललेल्या या प्रकारावर मध्यस्थी करण्यासाठी काही स्थानिक तरुणांनी प्रयत्न केला. मात्र बाहेरून आलेल्या जमावाकडून त्यांनाही मारहाण झाल्याने वातावरण अधिकच चिघळले. संतप्त गावकऱ्यांनी बाहेरून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना चांगलाच चोप दिल्याची माहिती आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच संबंधितांनी ज्या चारचाकी वाहनातून प्रवेश केला होता ते वाहन तेथेच सोडून पळ काढल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातील कार आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या असून एकूण १२ आरोपींपैकी उर्वरित पाच जणांचा शोध सुरू आहे.

हल्लेखोरांवर ‘रौडीशीटर’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिल्या असून सखोल तपासानंतर संपूर्ण वस्तुस्थिती समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. बाहेरून येऊन गावाची शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून यासंदर्भात लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − two =

error: Content is protected !!