बेळगाव : भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत भातकांडे गल्लीतील श्री ब्रह्मलिंग देवस्थानातील नव्या मुखवट्यांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळपासूनच मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी ७ वाजता श्री गणेश, श्री ब्रह्मलिंग थळदेव व श्री मारुती यांच्या पूजेसह कार्यक्रमाची सुरुवात झाली. वेदघोष व मंत्रोच्चारात अभिषेक आणि आरती पार पडली. दुपारी आणि सायंकाळी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थिती लावली.
सायंकाळी ५ वाजता ओटी भरणे व घागरी भरणे हा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर सायं. ६ वाजता ढोल-ताशांच्या गजरात भातकांडे गल्लीमध्ये मर्यादित मिरवणूक काढण्यात आली. परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सायंकाळी ७ वाजता सो. व श्री. दयानंद नामदेव कंग्राळकर यांच्या हस्ते अभिषेक व विशेष पूजा संपन्न झाली. रात्री ८ वाजता महाआरती करण्यात आली व उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले.
या सोहळ्यामुळे भातकांडे गल्ली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आनंद भातकांडे , महेश धामणेकर, विनायक भरडे, विक्रम भातकांडे , निहाल शहापूरकर, श्री लोहार, संकेत लोहार, सूर्यकांत गोडसे, महेश नागोजीचे, भाऊ माळी, रतन मुचंडी, नलिनी लेंगडे, सुधा भातकांडे, प्रणाली भातकांडे , यांच्यासह युवक, नागरिक , महिला व बालगोपाळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
