गाझियाबादमध्ये धक्कादायक घटना : ऑनलाईन गेमच्या व्यसनातून तीन बहिणींचा नवव्या मजल्यावरून उडी मारून मृत्यू

गाझियाबादमध्ये धक्कादायक घटना : ऑनलाईन गेमच्या व्यसनातून तीन बहिणींचा नवव्या मजल्यावरून उडी मारून मृत्यू

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : ऑनलाईन गेमच्या व्यसनाने किती भीषण परिणाम होऊ शकतात, याचे अंगावर शहारे आणणारे वास्तव गाझियाबादमध्ये समोर आले आहे. पाखी (१२), प्राची (१४) आणि विशिका (१६) या तीन सख्ख्या बहिणींनी मंगळवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आपल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, या तिन्ही बहिणी एका टास्क-आधारित ऑनलाईन ‘कोरियन’ गेमच्या आहारी गेल्या होत्या. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांचे हे व्यसन सुरू झाले होते. हळूहळू त्यांनी शाळेत जाणे कमी केले आणि अखेर शिक्षण पूर्णपणे सोडले. खेळाच्या प्रभावामुळे त्या तिघी सर्व गोष्टी एकत्र करीत असल्याचे सांगितले जात आहे—एकत्र आंघोळ, एकत्र जेवण, तसेच इतर दैनंदिन सवयीही कथितपणे गेममधील टास्कनुसार बदलल्या होत्या.

पोलिसांना घटनास्थळी आठ पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या पत्रात त्यांनी आपल्या मोबाईल आणि गेमिंग व्यसनाचा सविस्तर उल्लेख केला आहे. त्या नोटमध्ये लिहिले आहे, “पापा, सॉरी. कोरिया हेच आमचे आयुष्य आहे. कोरिया आमचे सर्वात मोठे प्रेम आहे. तुम्ही काहीही सांगितले तरी आम्ही ते सोडू शकत नाही.” या मजकुरामुळे तपास यंत्रणाही सुन्न झाली आहे.

मृत मुलींच्या वडिलांनी सांगितले की, महामारीनंतर त्यांच्या वागण्यात मोठा बदल दिसू लागला होता. त्यांनी कोरियन नावे स्वीकारली होती आणि त्याच नावांनी हाक मारावी, अशी त्यांची आग्रहाची मागणी होती. मोबाईल वापरावर निर्बंध घातल्यानंतर घरात तणाव वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधित ऑनलाईन गेम आणि त्यातील कथित आत्महानीस प्रवृत्त करणाऱ्या टास्कचा तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुलांच्या मोबाईल आणि ऑनलाईन गेमिंगवर पालकांनी काटेकोर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून तसेच मुलींच्या वडिलांकडून करण्यात आले आहे.

ही घटना केवळ एक अपघात नसून, डिजिटल व्यसनाचे गंभीर इशारे देणारी आहे. पालकांसाठी हा धडा असून, अल्पवयीन मुलांना मोबाईल दिल्यास त्यावर देखरेख करणे अत्यावश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + 17 =

error: Content is protected !!