हिंडलगा येथे प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

हिंडलगा येथे प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

हिंडलगा, दि. 29 (वार्ताहर) –
बेळगाव भागातील ग्रामीण परिसरात प्रथमच हिंडलगा येथे राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून ही स्पर्धा 22 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. राष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या जातात, त्याच धर्तीवर हिंडलगा येथे ही स्पर्धा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती हिंडलगा स्पोर्ट्स क्लबचे चेअरमन कर्नल मोहन नाईक यांनी दिली. गावाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल व्हावे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गावच्या सुपुत्रांचा गौरव व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेच्या फलकाचे अनावरण प्रसिद्ध उद्योजक व वयोवृद्ध सायकलपटू शिवाजीराव सडेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी रायगड स्पर्धा चढण्यात अजिंक्यपद मिळवलेले विलास जानबा नाईक, डॉ. इस्माईल अंबी, उद्योजक परशराम काकतकर, भीमसेना अध्यक्ष मनोज हितलमणी, निवृत्त कारागृह अधीक्षक उत्तम पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन चंद्रकांत कडोलकर यांनी केले. स्वागत भाषण स्पर्धा प्रमुख प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अनिल चौगुले, सुनील कुडचीकर, प्रथमेश नाईक, बाळू बेळगुंदकर, सुरेश सांगावकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर यांनी स्पर्धेच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली. तर आकाश किणेकर यांनी गावाची राष्ट्रीय पातळीवर नोंद व्हावी या उद्देशाने ३ किमी, ५ किमी आणि १० किमी धावण्याच्या स्पर्धा अत्याधुनिक टायमिंग चिप प्रणालीच्या साहाय्याने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन कृष्णा शहापूरकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. हा कार्यक्रम येथील ‘वृंदा एंपायर’ सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित सेवानिवृत्त जवान, युवक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या साक्षीने उत्साहात पार पडला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =

error: Content is protected !!