रामदुर्ग : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुळांगी गावात एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. चौथ्या मुलीस जन्म दिल्याच्या रागातून आईने केवळ तीन दिवसांच्या बालिकेची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हिरेमुळांगी येथील विधवा अश्विनी हल्कट्टी यांना आधीच तीन मुली असून मुलगा होईल अशी अपेक्षा होती. मात्र २३ नोव्हेंबर रोजी मुदकवी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिने पुन्हा मुलीला जन्म दिला. दुसऱ्याच दिवशी ती बालिकेसह घरी परतली.
मंगळवारी सकाळी अश्विनीची आई घराबाहेर गेल्याचा फायदा घेत अश्विनीने स्वतःच्या तीन दिवसांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने बालिका श्वास घेत नाही असे नाटक रचले. कुटुंबीयांनी तात्काळ बालिकेला रामदुर्ग तालुका रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी बालिकेचा गळा दाबल्यामुळे श्वास रोखून मृत्यू झाल्याचे निष्पन्न केले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच रामदुर्गचे डीवायएसपी चिदंबरम मडीवलार घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी आई अश्विनी हल्कट्टीला ताब्यात घेतले. ती बाळंतीण असल्याने तिला पोलिस सुरक्षा देऊन सध्या रामदुर्ग सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सुरेबान पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
