बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने सीमाभागात काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात येत्या प्रजासत्ताकदिनी, दि. 26 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथून होणार आहे.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी युवा समिती सीमाभाग यांनी लोकवर्गणीद्वारे आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत धर्मवीर संभाजी महाराज युवक मंडळ, गाडे मार्ग शहापूर यांच्या वतीने ३० हजार रुपये, तर बिचू गल्ली, शहापूर येथील युवा कार्यकर्ते ओमकार संजय बैलूर यांच्या वतीने ५ हजार रुपये अशी एकूण ३५ हजार रुपयांची मदत अध्यक्ष शुभम शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, अशोक घगवे, सुरज जाधव, राजू पाटील, उमेश पाटील, अमित पाटील, ओमकार बैलूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा, संस्कृती व अस्मितेच्या सन्मानासाठी निघणाऱ्या या यात्रेसाठी समाजातील विविध घटकांकडून मिळणारा पाठिंबा प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
