प्रतिनिधी, बेळगाव
बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड सुरू झाली आहे. पाटील मळा येथील रामचंद्र गांधी यांच्या घराची भिंत नुकतीच कोसळली असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून गुरुवारी तळकोट भागातील तलाठी शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. गांधी कुटुंबीयांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
गांधी यांचे सीटीएस नं. ३०३/३२ या क्रमांकाचे घर जुने असून सततच्या पावसामुळे भिंत कमजोर झाली होती. अखेर ती भिंत कोसळल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक जुनी घरे धोक्याच्या स्थितीत आली आहेत. प्रशासनाने तातडीने अशा घरांची पाहणी करून नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.