बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या तोंडावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीन नेत्यांना—मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे व मालोजीराव अष्टेकर—यांना पोलिसांनी बजावलेल्या खबरदारीच्या नोटीसीवरून मराठी जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. समितीने या नोटीसीला कायदेशीरदृष्ट्या आव्हान देण्याचा निर्णय घेतला असून, “दडपशाही कितीही झाली तरी १ नोव्हेंबर रोजी काळा दिनाची सायकल फेरी निघणारच,” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
मार्केट पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवाल क्रमांक 61/2025 नुसार, हे नेते संभाजी उद्यानातून १ नोव्हेंबर रोजी सायकल रॅली व आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याआधी 2023-24 मध्ये परवानगी नाकारूनही रॅली काढल्याचा दाखला देत, भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम कलम 2023 व 126 नुसार प्रत्येकी ५ लाखांची वैयक्तिक हमी व ५ लाखांच्या जामिनाची अट घालण्यात आली. या अनुषंगाने 28 ऑक्टोबर रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
या नोटीसीला उत्तर देण्यासाठी मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे व मालोजीराव अष्टेकर यांनी मार्केट पोलीस उपायुक्तांच्या वीरभद्र नगर येथील कार्यालयात हजेरी लावली. समितीने पाच लाखांचे वैयक्तिक हमीपत्र आणि पाच लाखांचा जामीन प्रत्येकी सादर केला असला, तरी नोटीसीत अनेक कायदेशीर त्रुटी आहेत, असा आरोप करण्यात आला.
समितीचे वकील अॅड. महेश बिर्जे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले,
“नोटीसीमधील काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. कायदा प्रक्रियेचे उल्लंघन करून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही ही नोटीस जिल्हा Sessions (सत्र) न्यायालयात आव्हान देणार आहोत.”
याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर केऴेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले,
“मराठी मन दडपता येणार नाही. कितीही दबाव आणला तरी आम्ही घाबरणार नाही. १ नोव्हेंबरला काळा दिनाची सायकल फेरी काढली जाणारच. मराठी जनतेचा आवाज पोलिसी नोटिसांनी थांबणार नाही.”
या घडामोडींनी राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मराठी-कन्नड वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून, महाराष्ट्र एकीकरण समितीने या नोटीस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
#Belgav #BedhadakBelgav
