बेळगाव | 15 जुलै 2025 – महाराष्ट्र एकीकरण चळवळीला नवा बळ देत खासदार धैर्यशील माने यांनी सीमाप्रश्नी निर्णायक पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सीमाभागातील तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर निपाणी येथे झालेल्या सत्कार समारंभात त्यांनी आगामी योजनांची माहिती दिली.
निपाणीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने खासदार माने यांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी सीमाभाग तज्ञ समितीचे सहअध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार माने म्हणाले की,
“मी स्वतः पुढाकार घेऊन सीमाप्रश्नी तज्ञ समिती व उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक आयोजित करणार आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लवकरच पाठवण्यात येईल. ही बैठक सीमाभागात – विशेषतः अर्जुननगर येथे घेण्याची विनंती करण्यात येणार आहे.”
बैठकीत सीमावाद, न्यायालयीन प्रक्रिया, स्थानिक जनतेच्या समस्या, आणि प्रशासनिक निर्णय यावर सविस्तर चर्चा होईल, अशी ग्वाही खासदारांनी दिली.
महत्त्वाचे मुद्दे:
महाराष्ट्र शासनाच्या नोकर भरती प्रक्रियेत सीमाभागातील उमेदवार वगळले जात असल्याने अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी ते सरकारसोबत चर्चा करणार आहेत.
राज्य शासनाच्या विविध योजना व विकास कार्यक्रमांत सीमाभागातील लोकांचा समावेश होण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अच्युत माने, महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी भागाचे अध्यक्ष जयराम मिरजकर,महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,सहकारी अमर विटे, जगदाळे खटावकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
ही बैठक घेऊन सीमाभागातील प्रश्नांवर ठोस दिशा ठरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढील लढ्याला आता नवे नेतृत्व आणि अधिक व्यापक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.
