बेळगाव: कपिलेश्वर मंदिरामागील कपिलतीर्थ तलावात 3 मे 2026 रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर प्रशासन हलले असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ठोस आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत पोहण्यासाठी गेलेल्या 7 व 10 वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा कठडा कोसळून मृत्यू झाला होता.
तलावाची जीर्ण अवस्था, तसेच याठिकाणी यापूर्वी घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित जागा गोडसे कुटुंबियांनी महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याचा दावा केला असला, तरी 2016 व 2022 मधील प्रक्रिया अद्याप पूर्ण का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गोडसे कुटुंबीय, युवा समिती सीमाभाग आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ निर्देश देण्याची मागणी केली. निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांना फोनवरून आदेश देत, हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तलावाच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी लागणारा खर्च, नकाशा व तपशील 7 मेपर्यंत सादर करण्यास सांगितले.
तसेच राज्य आपत्कालीन निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी व्यंकटेश गोडसे, श्रीकांत गोडसे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
