बेळगाव, २ ऑगस्ट २०२५:
श्री जोतिबा मंदिर, शिवबसवनगर, बेळगाव येथे श्रावण मासानिमित्त एक दिवसीय श्री केदार विश्वशांती यज्ञ रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार आहे. मंदिराच्या वतीने आयोजित या धार्मिक कार्यक्रमात विविध पूजन विधी, अभिषेक आणि हवन यांचा समावेश असून सर्व भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष यज्ञाचा प्रारंभ सकाळी ७ वाजता श्री नाथ रुद्राभिषेकाने होणार असून त्यानंतर पुण्यवाचन, गणपती पूजन, शक्तीपीठ पूजन, नवग्रह पूजन, रुद्रपीठ पूजन, सत्यनारायण पूजन आणि अखेर होम हवन पार पडणार आहे. या शांती यज्ञामध्ये भाग घेऊन सर्व भाविकांनी आपापल्या समस्या दूर व्हाव्यात, सौख्य, शांती व आरोग्य लाभावे यासाठी यज्ञात आहुती देण्याचे महत्त्व सांगितले जात आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, हा अध्यात्मिक लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन श्री जोतिबा मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रावण मासातील ही पावन धार्मिक परंपरा अनेक वर्षांपासून जोपासली जात असून, यंदाच्या यज्ञाला देखील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.