बेळगावमध्ये “मित्रा फाउंडेशन”चा दिमाखात प्रारंभ – मराठा समाजातील उद्योजकांसाठी नवी दिशा!

बेळगावमध्ये “मित्रा फाउंडेशन”चा दिमाखात प्रारंभ – मराठा समाजातील उद्योजकांसाठी नवी दिशा!

📰 बेळगावमध्ये “मित्रा फाउंडेशन”चा दिमाखात प्रारंभ – मराठा समाजातील उद्योजकांसाठी नवी दिशा!

बेळगाव │ मराठा समाजातील तरुण उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या उद्योग-व्यवसायाला नवी गती देण्यासाठी स्थापन झालेल्या “मित्रा फाउंडेशन” या नव्या संस्थेचा दिमाखात प्रारंभ समारंभ मंगळवारी सायंकाळी मंडोळी रोडवरील अयोध्या भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, झुवारी ॲग्रोचे माजी उपाध्यक्ष आर. वाय. पाटील, कर्नाटक स्टेट बार कौन्सिलचे उपाध्यक्ष व वकील विनय मांगलेकर, डॉ. उज्वल हलगेकर, दीपक गोजगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अनंत लाड म्हणाले – “खर्चीलेला पैसा, संपत्ती, ज्ञान पुन्हा मिळवता येते, पण गेलेला वेळ कोणालाही परत आणता येत नाही. म्हणून मराठ्यांनी वेळेचे नियोजन करून सचोटीने व्यवसाय करावा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अपयश कधीच येणार नाही.” त्यांनी समाजातील एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत इतर समाजातील सकारात्मक गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंत साळुंके यांनी केले, तर उद्देश स्पष्ट करत गुरुनाथ किरमटे यांनी फाउंडेशनच्या ध्येयाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन अनंत लाड आणि मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते झाले. रामकृष्ण पाटील यांनी लोगोचे अनावरण केले, तर विनय मांगलेकर, दीपक गोजगेकर आणि विश्वजीत हसबे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण झाले.

फाउंडेशनचे संस्थापक कुलदीप हंगीरगेकर यांनी सांगितले – “स्थानिक व्यावसायिकांना एकत्र आणून व्यवहार आणि बाजारपेठेतील स्थान मजबूत करणे, ऑनलाईन व्यापार व जाहिरातींसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करणे, तसेच प्रेरणादायी वक्त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन देणे हा उद्देश आहे. लवकरच फाउंडेशन शिक्षण क्षेत्रातही पदार्पण करेल.”

फाउंडेशनचे विकास मांडेकर म्हणाले – “शिवरायांनी घालून दिलेली शिस्त आम्ही संस्थेत जपणार आहोत. ‘आपला समाज, आपला व्यवसाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही एकजुटीने काम करू.”

झुवारी ॲग्रोचे माजी उपाध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी फाउंडेशनची स्तुती करताना म्हटले – “मित्रा फाउंडेशन हा फक्त गट नाही, तो एक ब्रँड बनला पाहिजे. समाजातील विकास आणि परस्पर सहकार्य हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.”

विनय मांगलेकर म्हणाले – “सर्व समाजातील लोकांना विश्वासात घेऊन पुढे गेलो तर कधीच मागे पडणार नाही.”
तर डॉ. उज्वल हलगेकर यांनी समाजासाठी देण्याची भावना जपण्याचे आवाहन केले. दीपक गोजगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे अवलंबन करून एकमेकांना सहाय्य करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान देणगीदार मदन बामणे आणि आर. एम. चौगुले यांनी विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाचा खर्च उचलण्याची घोषणा केली, तर एका देणगीदाराने फाउंडेशनसाठी अडीच गुंठे जागा दान दिली.

या प्रसंगी मारुती गुरव, रविंद्र थोरात, महेश पावशे, विशाल मुचंडी, ज्ञानेश्वर बेळगांवकर, सोमनाथ गोडसे, भाग्यश्री पवार, सागर मुतकेकर आणि मनोहर घाडी या तरुणांनी मित्रा फाउंडेशनची सुरुवात केली. फाउंडेशनच्या पावती पुस्तकाचे अनावरण अनंत लाड यांनी केले, तर मेंबरशिप फॉर्मचे अनावरण डॉ. उज्वल हलगेकर यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद काटकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. विनोदिनी आनंदे आणि सौ. रोशनी हुंद्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरांग गेंजी आणि अभिजीत पवार यांनी विशेष योगदान दिले.

📍 “मित्रा फाउंडेशन” – मराठा समाजातील उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रासाठी नव्या दिशा दाखवणारा उपक्रम!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + two =

error: Content is protected !!